Wednesday, December 25, 2019

मनालीला आम्ही भावंडे गेलो असताना राजवाड्यामागच्या शाळेतील हा 'हमामा '.......

                   *हमामा* 

माध्यान्ही वृक्षाच्या खाली शाळा ही भरली,
मुले मौक्तिके सरस्वतीच्या जणू  कंठी सजली.
मध्यांतरीच्या सुटीत मोत्ये पांगती सर्वदूरी!
टपटप येथून जाती तेथे मुळी न येती करी.

गुरूजन मेळा सुखे विसावे सावलीत तरूच्या,
मुले विसरती भान खेळता खेळ चेंडूफळीचा.
कुणी धावती धरुनी जोडी शिवण्या दुसऱ्यांना,
सोनसाखळी खेळ तयांचा असा भरा आला.

कोणी धावे पुढे तयाला उचली दुजा वरती,
बाकी हसती खदखद येई आनंदा भरती!
उत्साहाच्या लाटा जाती संतत लय विलया,
लताद्रुमांना तया पाहता हर्ष मनी झाला.

असा हमामा चालत राही भवतालामाजी,
कुणा न घाई अगदी आता घंटा होण्याची!
काल  म्हणे कोणा शहा वाणीयाने ,
              पैठणकराला चोप दिला .

मराठी लोकांची माथी सणकली,
               पोलीस म्हणती दोषी दोघे.

दुसऱ्या दिसाला हात बदलले,
            पाठही बदले हाताखाली .

कविमन लागे शोधाया तात्पर्य,
               श्रेयाला तत्पर संधीसाधू.

लढा तो नव्हता प्रांतप्रांतीयांचा,
               वृत्तीवृत्तीतला दोष असे.

यया कारणाने जमला मराठी,
          ' मॉक ड्रिल ' च मानावे या.
[कवी अनिलांच्या 'बाई या पावसानं '
कवितेवर आधारित .... ]
____________________

* या सोशल मिडीयानं.....*  
____________________

या सोशल मिडीयानं  
उडविली फार धूम,
घरातलं बंद झालं 
परस्पर संभाषण . 

या सोशल मिडीयानं  ... 

दिसभर देई ठाण ,
रात्रीही ना सोडे मान 
नवनव्या पोस्टस् ची 
हा करी पखरण . 

या सोशल मिडीयानं  ... 

बोलघेवडयांना भावे, 
अबोलांस ही आवडे 
उरवी हा देह येथे 
नेई मना सिंधुपार !

या सोशल मिडीयानं  ... 

चिवचिव विचारांची 
कधी राळ प्रचाराची 
पसरवी अफवांना 
कधी ' फॉर्वर्डस् ' मधून  

या सोशल मिडीयानं  ... 

व्हायरल पोस्टस् होती 
कॉपी पेस्ट सर्वां हाती 
प्रतिभेची होई  क्षिती 
भावनांना पडे बेडी नानाविध ' इमोजी ' त 

या सोशल मिडीयानं  ...

याने कामे फार होती 
व्यापाराला मिळे गती 
करी सेवा समाजाची 
देई क्षणार्धात ख्याती 

या सोशल मिडीयानं  ...

याच्या गुणा नाही तोटा, 
नाही दोषांनाही पार
नाही 'तो ' तर खोळंबा,
असे तर अडचण !

या सोशल मिडीयानं  ...