Wednesday, September 25, 2019

साठवण

  मी जेव्हा एखादे पुस्तक वाचत असते तेव्हा काही काही जुने संदर्भ एकदम गवसतात. किंवा लेखक व कवी  एखादे वाक्य असे लिहितो कि मनाचा ठावच घेतला जातो. 


           जेव्हा मी शिक्षणतज्ज्ञ गिजुभाई बधेकांबद्दल अशी माहिती वाचली की ते आगगाडीमधून दूरच्या प्रवासाला निघाले होते, आणि वाटेत वाचण्यासाठी म्हणून त्यांच्या मित्राने त्यांना मॅडम मॉंंटेसोरी यांचे बालशिक्षणावरील पुस्तक दिले आणि त्या पुस्तकाच्या वाचनाने त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलली . हा संदर्भ मला खूप आवडला. 


           विजय तेंडुलकरांना कवियत्री इंदिरा संत यांचे यजमान शिक्षक म्हणून शिकवायला शाळेत होते. आणि गम्मत म्हणून ते तेंडुलकरांच्या कोटाच्या खिशात हात घालीत. असा गोड संदर्भ. 


           प्रसिद्ध रंगकर्मी मोहन वाघ हे एकदा आपल्या दादरच्या निवासस्थानी पायरीवर बसले होते तेव्हा एक अगदी फाटका माणूस त्यांकडे आला आणि त्याने त्यांकडे पाणी मागितले वाघांनी पाण्यासोबत त्यास पैसेही देऊ करताच पैसे त्या माणसाने त्यांस परत केले आणि तो माणूस निघून गेला आणि समोरच्या गर्दीत हरवला. पण दुसऱ्या एका माणसाकडून जेव्हा त्यांना कळले की ते गाडगेबाबा होते, तेव्हा आश्चर्य, आदर,आपण त्यांना ओळखलं नाही याची हळहळ अशा मिश्र भावना वाघ यांनी अनुभवल्या. आणि ते गाडगेबाबांनी परत केलेले पैसे त्यांनी खर्च न करता कायम स्वतःकडे जपून ठेवले. ही आठवण मला कळली हे माझं भाग्य! 


           साहित्य संघात पं सुरेश हळदणकरांचं 'श्रीरंगा कमलाकांता' सुरू होतं. हळदणकरबुवा नेहमी सारखेच रंगले होते. पेटीवर साथीला गोविंदराव पटवर्धन होते. तबल्याच्या साथीला दामुअण्णा पार्सेकर होते. तेही रंगून वाजवत होते. त्यादिवशी एकंदरीत 'श्रीरंगा कमलाकांता' अफाटच जमलं होतं. आणि विशेष म्हणजे हळदणकरबुवांच्या तोडीस तोड गोविंदरावही तेवढेच रंगून वाजवत होते. हळदणकरबुवांची प्रत्येक जागा, प्रत्येक हरकत अशी काही सही सही घेतली जात होती की खुद्द बुवाच आश्चर्यचकीत झाले. मंडळी त्या मूळ पदात शेवटी 'धोडो-सदाशिव जोड रे' अशी ओळ होती, तिथे ऐनवेळेला हळदणकरबुवांनी भारावून जाऊन 'दामू-गोविंदा जोड रे' असा बदल केला आणि सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. श्रीरंगा कमलाकांता या फार सुरेख पदात गोविंदरावांना अढळ स्थान मिळालं! हा सोन्या रूप्यानी तोलण्यासारखा क्षण  मला वाचायला मिळाला. 


           संत सोहिरोबांसंदर्भातील एक प्रसंग.... घरच्या गरिबीमुळे आपल्या कवितांसाठी लागणारा कागदही ते विकत घेऊ शकत नव्हते. त्यांची बहीण फणसाच्या कोवळ्या पानांवर ते लिहून त्यांचे पेळे नीट लावून ठेवत असे. एकदा या  भावंडांच्या  अनुपस्थितीत त्यांच्या आईने पाचोळा समजून हे पेळे सरळ न्हाणीच्या चुलीत घातले होते. अशा ओढग्रस्त स्थितीत सोहिरोबांनी तेवढी प्रचंड साधना कशी केली असेल, याचे आश्चर्य वाटते . भस्मसात झालेल्या कवितेबद्दल त्यांच्या तोंडून दु:खाचा उद्गगारही निघाला नव्हता, असे त्यांच्या भगिनीने लिहून ठेवल्याचेही इतिहासकार सांगतात. 

           तीच गोष्ट मॅडम मॉंटेसोरी यांची. ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती नुकतीच झाली होती. त्या निमित्ताने स्त्रिया प्रथमच फॅक्टरीमधून काम करण्यासाठी घराबाहेर पडल्या. आणि मग त्यांच्या कच्च्याबच्यांना कोण सांभाळणार हा नवाच प्रश्न निर्माण झाला. मॅडम मॉंटेसोरी यांना तो प्रश्न जाणवला आणि तो त्यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या कामकरी स्त्रियांच्या मुलांसाठी बालवाड्या काढल्या. आणि मॉंटेसोरी शिक्षण पद्धत रूढ केली. मॉंटेसोरीच्या मते, सहा वर्षापर्यंतच्या बालकांवर  हसत खेळत मिळालेले इंद्रियशिक्षण दूरगामी असे सकारात्मक परिणाम घडवून आणते. या त्यांच्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी इंद्रियशिक्षण देणाऱ्या अनेक शैक्षणिक साधनांची निर्मिती केली. त्या साधनात एक साधन असेही होते की, तो एक लाकडाचा पोकळ ठोकळा  होता. तो सर्व बाजूनी बंद होता. मात्र त्या लाकडी खोक्यात वस्तू आत टाकण्यासाठी भोके निर्माण करण्यात आली होती. परंतु ही भोके वैशिष्ट्यपूर्ण होती. साधीसुधी नव्हती. काही  भोके त्रिकोणी वस्तू त्यातून आत जाऊ शकतील अशी, तर काही भोके त्यातून फक्त चौकोनी वस्तूच आत जाऊ शकतील अशी. मग त्याचप्रमाणे काही पंचकोनी, षट्कोनी, दंडगोल वगैरे.  हे अभिनव खेळणे मुलांना खूपच आवडले.  आपले तनमन हरपून ती मुले अशाप्रमाणे निरनिराळ्या संकल्पनांवर आधारित नाविन्यपूर्ण खेळण्यांसोबत खेळत राहात. एकदा मॉंटेसोरींच्या या बालवाडीला भेट द्यावयास एक शिक्षणतज्ज्ञ आले. त्यांनी सोबत मुलांना देण्यासाठी बिस्किटे, कुकीज आणल्या होत्या. त्या एकेकाला देत देत ते या आकार खोक्यावर खेळणाऱ्या मुलापाशी आले, आणि त्यांनी आपल्याजवळील बिस्कीट त्यास दिले. मुलाचे बिस्किटासारख्या गोष्टीकडेही लक्ष गेले नाही. खेळणारे मूल आपल्याच नादात होते. त्याने अगदी अजाणतेपणाने  ते बिस्कीट घेतले आणि त्याचा आकार पाहून ते आकार खोक्याच्या कोणत्या भोकातून खोक्यात जाऊ शकेल हे तो पाहू लागला ! या प्रसंगामुळे ते शिक्षणतज्ज्ञ खूपच प्रभावित झाले. आणि मॉंटेसोरी मॅडमच्या शैक्षणिक साधनांची, खेळण्यांची त्यांनी तोंडभरून तारीफ केली. हे सांगणे नलगे. 


अंजली दाबके


मी म्हणे गोपाळू

 अवचिता परिमळू । झुळकला अळुमाळु । मी म्हणे गोपाळू । आला गे माये ।। .....   ...... 

          ही ज्ञानेश्वर माउलींची सुप्रसिद्ध विरहिणी आहे. 

          ज्ञानेश्वरांनी रचलेल्या या  'विराणी' त (विरहिणीत) त्या शुद्ध चैतन्याची भेट व्हावी याची आर्तता भरून राहिली आहे. आणि मग शेवटी तो 'सावळा सुंदर' तिला भेटतो आणि तिला अद्वैताचा साक्षात्कार होतो. 


          या 'अवचिता परिमळू । झुळकला अळुमाळु ' चा अनुभव जसा त्या विराणीतील गोपिकेला आला तसा आपल्यालाही येत असतो. फक्त आपण जाणवून घेतोच असं नाही. 
          

            साहित्य वाचताना अनेकदा सारस्वताचे  घबाडचं हाती लागल्यासारखे वाटते आणि ज्ञानाचा महासागर त्या पुस्तकातून आपल्याकडे उसळून येऊ पाहतोय असे वाटते. तो ज्ञानाचा, माहितीचा जोर बुद्धीला सहन होत नाही. अशा वेळी मी पुस्तक मिटून घेते आणि सद्गदित होते. मनात म्हणते, "हो बाबा, मी वाचणार आहे तुला, पण हळू हळू. तुझं विश्वरूप सोडून मला सामोरा ये पाहू! तुझं सौम्य असं मानवी रूप मला झेपेल, पेलेल. " या ठिकाणी मला खचितच हा अळुमाळु परिमळू पसरविणारा तो हजर असल्याचा भास होतो. 




अंजली दाबके

Sunday, September 22, 2019

खाचखळगे

गल्लीतला रस्ता खाचखळग्यांचा आहे;
म्हणून कालपरवापर्यंत नगरसेवकाला शिव्या देणारे आमचे 'आळी ' कर ;
आज रस्ता सिमेंट काँक्रिटचा केल्यावर ,
तो वाळण्याआधीच त्यावर ठसे उमटवत बेधडक चालले...!!!

हे नालायकांनो, आता परत कधी नक्राश्रू ढाळू नका ; 
विकास होत नाही म्हणून... !!! 

आणि कोण कौतुक करणार तुमचं या पाउल ठशांबद्दल ;
कारण ही तुमची विध्वंसक पावले म्हणजे 
काही चंद्रावर उमटलेली पावले नाहीत ;
मानवजातीला ललामभूत ठरलेली... 

हे नालायकांनो, आता परत कधी नक्राश्रू ढाळू नका ; 
विकास होत नाही म्हणून... !!!

ओल्या सिमेंटवर बेदरकारपणे उमटलेली तुमची ही नाकर्ती पावले 
हा रस्ता आता कायमचा 
मिरवत राहील त्याच्या छाताडावर ....  
विष्णूच्या हृदयावरील "श्रीवत्सलांच्छना " सारखा . 

हे नालायकांनो, आता परत कधी नक्राश्रू ढाळू नका ; 
विकास होत नाही म्हणून... !!!

आता हे शासना,या ' प्रजासत्ताक ' नागरिकांना;
 तू ही दे एक ' काव्यात्मक ' शासन ... 
या विध्वंसक पावलांचा ;
एक शासकीय जाहीर  'पाऊल उंडे ' सोहळा साजरा करून ...!!! 

हे नालायकांनो, आता परत कधी नक्राश्रू ढाळाच 
विकास होत नाही म्हणून... !!!

©अंजली दाबके

Wednesday, September 11, 2019

फकीर

*फकीर* 

नगरीमधला जुना मुहल्ला ;
गर्दीनी अति भरून गेला. 
मधोमधी हा पथ वाहे अन् ,
हाट दुतर्फा सजतो नित नव.   

नव्या हिकमती नवे नमुने ,
नवे रंग नी मोहक दावे. 
लढवुनी करण्या क्रेत्यांना सर !                
गढूनि गेले आपणिक जन. 

गर्दीतून ही अशा प्रभाती ;
मंद झुळूक ये हवी हवीशी. 
कानी आली जिच्यासवे अन् ,
गभीर गीती ' बुल्लेशा ' ची. 

रुमाल हिरवा डोकी साजे ,
रुळूनी मणी तो कंठही विलसे. 
हाती चिमटा गात चालला ; 
गूढ काफियाॅं असा फकिरा. 

बाजूस एका 'मोह ' चीजांचा ,
दुजा बाजूला 'क्षय ' गरजांचा. 
कविमन पाहे दुरुनी हा क्षण ;
हरखे होता 'त्या ' चे दर्शन. 

बाळ एक ये गर्दीमधूनी ;
दुडक्या चाली हसे निरंतर.  
फकीरासंगे चालत जाई ;
गम्मत म्हणुनी काही अंतर... 

रमे फकीरही त्याच्यासंगे ;
मोरपीस त्या देई अलगत.  
जणू सोपवी बाळालागी ; 
अनुभूतीचे सारे संचित .


----------------------------------------
*शब्द संदर्भ -
हाट -बाजार
क्रेते - गिऱ्हाईक 
आपणिक - दुकानदार
बुल्लेशा / बुल्ले शहा - पंजाबी सुफी संत
काफियाॅं - बुल्ले शहा या संताची आध्यात्मिक रचना. 
----------------------------------------
©अंजली दाबके